सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून लोकसभेच्या खासदारकीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. विद्यमान खासदार जरी भाजपचा असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये या खासदारकीवरून चर्चेला ऊत आले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणूकीत झालेल्या दोन वेळच्या पराभवानंतर आपण यंदाची लोकसभा लढवणार नाही असे दोन ते तीन वेळा जाहीरपणे सांगितले आहे आणि एकूणच परिस्थिती पाहता ते मैदानात यावेळी उतरण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांना वाढदिवसाच्या दिवशी दीर्घायुष्यसह भावी खासदारकीच्याही शुभेच्छा दिल्या. या खासदारकीच्या शुभेच्छा वरून काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण आहे. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आरिफ भाईंचे कुंकू सहित मंगळसूत्रही काढले. नरोटे यांचं सगळं राजकारण माहीत असलेल्या आरिफ शेख यांनी मात्र या विषयात सावध प्रतिक्रिया देत जादा बोलणे टाळले.
या विषयात सुधीर खरटमल सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. सोलापूरच्या खासदारकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्याने त्याचं काँग्रेसनेही टेन्शन घेतले आहे. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला उमेदवार नसल्याने सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात सुधीर खरटमल यांच्याही नावाची चर्चा झाली. परंतु साहेबांच्या विरोधात आपण कधीही उभारणार नाही, आपण तसा विचारही करू शकत नाही असे खरटमल यांनी सांगितले होते. मात्र आता स्वतः शिंदे यांनी लोकसभा लढवणार नाही अशी घोषणा केल्याने खरटमल यांनी दंड थोपटले आहेत.
त्यानुसार खरटमल हे तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते, सुधीर खरटमल यांच्या नावावर खुद्द शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलयं. त्यांना लोकसभेची तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी लोकसभेची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.