मुंबई :- पिडीता नामे अफसाना सरफराज अहमद पटेल हिने सोलापूर येथील अंतरिम पोटगीच्या आदेशाविरुध्द दाखल केलेल्या याचिकेमध्ये उच्च न्यायालय, मुंबई यांनी रक्कम 10 हजार रुपये पोटगीचा आदेश पारित केला.
यात थोडक्यात हकीकत अशी की, पिढीता अफसाना सरफराज अहमद पटेल हिने सोलापूर येथील मे. न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत अर्ज दाखल केलेला होता. त्या अर्जामध्ये मे. न्यायालयाने रक्कम रु.5000 अंतरिम आदेश केलेला होता. त्या आदेशा विरुध्द पिडीता अफसाना सरफराज अहमद पटेल हिचा पती सरफराज अहमद मैनोद्दीन पटेल यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालयात अंतरिम पोटगी विरुध्द अपिल दाखल केले त्यामध्ये मे. न्यायालयाने पिडीताची अंतरिम पोटगी रक्कम रु.5000 वरुन रक्कम रु.3000 देण्याचा आदेश केला. त्यानंतर यातील पिडीता अफसाना हिस आर्थिक अडचणी तसेच आजारी असल्यामुळे पिडीता हिस सन 2017 पासून सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशाविरुध्द उच्च न्यायालय, मुंबई येथे अपिल दाखल करता आली नाही.
परंतू त्यानंतर यातील पिडीता अफसाना हिने उच्च न्यायालय मुंबई येथे क्रिमिनल याचिका क्र. WP/3590/2022 अफसाना सरफराज अहमद पटेल विरुध्द सरफराज अहमद मैनोदीन पटेल ही याचिका दाखल केली. सदर याचिकाची सुनावणी दि. 10/09/2023 रोजी ठेवण्यात आली. सदर याचिकेमध्ये उच्च न्यायालय, मुंबई येथीलन्यायमुर्ती माधव जे. जामदार यांच्यासमोर युक्तीवाद करण्यात आला. सदर युक्तीवादामध्ये पिडीताचे पती सरफराज अहमद मैनोदीन पटेल हे कोकणा मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ, गांव- कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधूदुर्ग येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांना वेतन असल्याचे पिडीताचे अॅड. महंमद एस. मुल्ला यांनी युक्तीवाद करुन निदर्शनास आणून दिले. त्यानंतर यातील पिडीताचे अॅड. महंमदएस. मुल्ला यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने पिडीताची याचिका मंजूर करून पिडीताचे पती सरफराज अहमद मैनोद्दीन पटेल याना पोटगीपोटी रक्कम रु.10,000 दरमहा वेतनातून कपात करण्याचा आदेश पारित केला.
यामध्ये पिडीता अफसाना सरफराज अहमद पटेल तर्फे उच्च न्यायालय मुंबई येथील अॅड. महंमद एस. मुल्ला यांनी काम पाहिले. तसेच अॅड. दिपक किसन भोसले यांनी सहकार्य केले. तसेच पिडीता यांनी संपूर्ण कागदपत्राची पुर्तता केली. पिडीताचे पती सरफराज अहमद मैनोद्दीन पटेल यांच्यातर्फे अॅड. खतीब वकिल, अॅड. अब्दुला सलीम खतीब ज्यांनी काम पाहिले..