मुंबई, 23 नोव्हेंबर
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे तसेच संलग्न रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँकेने 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके वित्तीय सहाय्य करण्यास सहमती दर्शविली आहे. आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) बोर्डाने आज याला मंजुरी दिली.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एडीबीसोबत 7 नोव्हेंबर 2022 रोजी बैठक घेतली आणि या प्रस्तावाला गती दिली. केंद्र सरकारकडे सुद्धा त्यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला होता. आज हा निर्णय झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. एडीबीच्या संचालक मंडळाचे सुद्धा त्यांनी आभार मानले आहेत. 2030 पर्यंत राज्यात सर्वांच्या कक्षेत आणि परवडणार्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा देणारे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, हा या प्रकल्पाचा मुख्य गाभा आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गुणात्मक बदल आणि तज्ञ डॉक्टरांच्या सेवा यातून मिळणार असल्यामुळे राज्यात वैद्यकीय क्षेत्रात लक्षणीय बदल घडून येतील. वैद्यकीय शिक्षणाच्या कक्षा रुंदावणे आणि अविकसित भागात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे, हेही यामाध्यमातून साध्य होणार आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय शिक्षणात सामाजिक आणि समान प्रतिनिधीत्त्व असेही घटक असून, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागात जेंडर युनिट कार्यरत करण्यासाठी सुद्धा एडीबीमार्फत सहाय्य केले जाणार आहे. यातून वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधा सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार होणार आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.