सोलापूर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्या आणि जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्या संदर्भात सोलापूरच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय बैठक पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे होते.
प्रामुख्याने दोन्ही मागण्या मान्य न केल्यास काष्ट्राईब महासंघ व इतर समविचारी संघटनेला सोबत घेऊन शासनाच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. बैठकीस महासंघाचे वरीष्ठ उपाध्यक्ष सुमीत भुईगड, विभागीय अध्यक्ष राजाराम इंदवे उपस्थित होते.
राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षणा नुसार पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. महासंघातर्फे कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नती पूर्ण होण्यासाठी शासन आणि न्यायालयीन स्तरावर मागणी आणि पाठपुरावा सुरू आहे. तरीही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच राज्यातील शासकीय व जिल्हा परिषद कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना इतर काही राज्याप्रमाणे लागु करावे, बाह्ययंत्रणे कडून परिचर व वाहन चालक यांचे भरती न होता पूर्वीप्रमाणे बिंदूनामावलीचा अवलंब करून नियमित पद्धतीने शासनाने भरती करावी, राज्यामध्ये अनेक विभागांमध्ये सरळ सेवेची पदे व मागासवर्गीय अनुशेष जागा वर्षानुवर्ष शिल्लक असलेल्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, तसेच सध्या रिक्त जागेच्या 80% पदे भरणे ऐवजी 100% रिक्त पदांची भरती करावी यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्तरावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी सोलापूर येथे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा विचार करून तात्काळ निर्णय घेऊन प्रलंबीत प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांचा विचार किंवा निर्णय नाही झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काष्ट्राईब महासंघातर्फे पुढील महिन्याच्या फेब्रुवारी 2023 मध्ये शासनाच्या विरोधात एक दिवसाचे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी दिली. यासाठी राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यभर दौरे सुरू केले आहेत.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, महासंघाचे कार्याध्यक्ष कल्याण श्रावस्ती, कोषाध्यक्ष एस.ए.लोहार, उपाध्यक्ष विजय माने, जिल्हा सचिव अरविंद जेटीथोर, सहसचिव महेश लोंढे, संघटक सचिव लक्ष्मण गायकवाड, जिल्हा परिषदे शाखेचे पदाधिकारी भगवान चव्हाण, उमाकांत रजगुरू, नरसिंह गायकवाड, मकरंद बनसोडे, मोहित वाघमारे, नागनाथ धोत्रे, नागसेन कांबळे, योगेश कटकधोंड, डी.एम.व्हटकर, धनंजय जगताप, दिपक सोनवणे, गणेश शिंदे तसेच महसूल शाखेचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे, पाटबंधारे शाखेचे अध्यक्ष शरण अहिवळे, आरटीओ शाखेचे अध्यक्ष रणदिवे, खांडेकर यांच्यासह कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष राजेश देशपांडे यांनी कार्याध्यक्ष गणेश मडावी यांचा सत्कार केला.