सोलापूर :- आषाढी वारी 2023 मध्ये सर्व वारकऱ्यांना यावेळी निर्मल युक्त वारी हरित वारी व्हावी यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी 1 जुनं 2023 रोजी शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वारकऱ्यांना स्वच्छ (निर्जंतुक) पाणी उपलब्ध करून द्यावे महिलांना एस टी बसचे अर्धे तिकीट असल्याने यावेळी महिला वारकरी अधिक येण्याची शक्यता आहे .यावेळी महिलांना तपासणीसाठी महिला वैद्यकीय अधिकारी देण्यात यावे असे सूचना करण्यात आले वारी मार्गावर प्रति दोन किलोमीटर वर एक औषध उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. अक्कलकोट तालुक्यामधील वीस बेडचा ट्रॉमा सेंटर लवकरात लवकर चालू करण्यात यावा असे सूचना देण्यात आल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू करण्यात यावे. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र हलवण्यात यावे याबाबत ही सूचना दिल्या. जनतेला योग्य त्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सुचना देण्यात आल्या.
बैठकीत जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण करण्यात आले. माझे गाव कोरोना मुक्त गाव, माझे मूल माझी जबाबदारी, जन संजीवनी अभियान, जीवनाची हमी बालमृत्यू कमी, अशा नावीन्यपूर्ण योजनेच्या कामकाजाबद्दल म्हैसकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सीईओ स्वामी यांनी *एका कुटुंब एक वृक्ष* या अभियाना अंतर्गत पालखी मार्गावर वृक्ष लागवड व संवर्धनाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. गत वर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने *हरित वारी* ही संकल्पना राबविली होती. तीच संकल्पना व्यापक प्रमाणात यावर्षी या अभियानात राबवून पालखी मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीनी गाव परिसराबरोबरच पालखी मार्गावर प्राधान्याने वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक कुटुंबाला या लावलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून येत्या पाच सहा वर्षांत पालखी मार्ग हरित होवून वारकऱ्यांना मुबलक सावली उपलब्ध होईल.
या बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे ,जिल्हा शलचिकित्सक डॉ धनंजय पाटील, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बिरूदेव दूधभाते , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी व जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



















