सोलापूर : अनेक वर्षापासून रखडलेल्या सोलापुरातील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचा लोकार्पण सोहळा अखेर संपन्न झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य रस्त्याच्या कडेला इमारत आता शोभून दिसत आहे. लवकरच या इमारतीमध्ये शासकीय कार्यालय स्थलांतरित होतील सुरुवातीला अपर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्वात अगोदर स्थलांतरित झाले आहे.
परंतु कार्यालय सुरू होण्यापूर्वीच प्रशासन सध्या टेन्शनमध्ये आले आहे. कारण या कार्यालयाचा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याठिकाणी लावण्यात आलेल्या दोन महागड्या फोटो फ्रेम चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
उद्घाटनासाठी कार्यालय सजवण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असल्याने सोलापुरातील एका नामांकित फोटोग्राफरच्या महागड्या चित्रांची फ्रेम जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मिटिंग हॉलमध्ये लावण्यात आल्या होत्या.
परंतु उद्घाटनानंतर तिसऱ्याच दिवशी मीटिंग हॉलमधील दोन फ्रेम चोरीला गेल्या असल्याचे समजले. यावरून या इमारतीच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. इमारतीमध्ये प्रवेश करायला पाच ते सहा ठिकाणावरून व्यवस्था आहे. त्यामुळे चोरी नक्की केली कोणी? याचा मात्र अद्याप पत्ता लागलेला नाही.




















