सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील सराईत गावठी हातभट्टी दारु व्यावसायिक संजय नामदेव राठोड (वय ४५) यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे.
राठोड हा त्याच्या साथीदारांसह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जेलरोड पोलीस ठाणे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गावठी हातभट्टी दारुच्या व्यवसायात गुंतलेला आहे. तो हातभट्टी दारूची वाहतूक, पुरवठा आणि विक्री करत असल्याबद्दल त्याच्याविरुध्द एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुनदेखील त्याची गुन्हेगारी वर्तणूक सुटत नव्हती. त्याने पुन्हा अवैध हातभट्टी दारुचा व्यवसाय चालूच ठेवला होता. अगदी अलीकडील कालावधीत त्याने ३ गुन्हे केले आहेत.
राठोड हा हा हातभट्टी दारु व्यवसायाचा मालक आहे. हातभट्टी दारुची वाहतूक करताना तो आणि त्याच्या साथीदारासह वाहने निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत. त्याच्या बेकायदा व्यवसायास विरोध करणारे किंवा पोलिसांना माहिती देणाऱ्या लोकांना तो त्याच्या साथीदारासह शस्त्राने मारहाण करतो.
भविष्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी स्थानबध्दतेचे आदेश दिले. त्याची येरवडा कारागृह, पुण्यात रवानगी करण्यात आली आहे. त्यास
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची पाचवी व या वर्षातील पहिली कारवाई आहे.