सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या ‘हाथ से हाथ जोडो या अभियान नियोजन बैठकीचे आयोजन शुक्रवारी काँग्रेस भवनात करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील होते. बैठकीला महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष भीमाशंकर जमादार, भीमराव बाळगे, रमेश हसापुरे, माजी सभापती अशोक देवकते, अशफाक बळोरगी, सुधीर लांडे, मोतीराम चव्हाण यांच्यासह सर्व सेलचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सातलिंग शटगार यांनी केले.
राज्यामध्ये काँग्रेस पक्षाने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांनी ही बैठक घेतली. बैठक अभियान राबवण्याची होती मात्र या बैठकीत नुकतेच रद्द करण्यात आलेल्या तालुका अध्यक्षांच्या निवडीच्या अनुषंगाने दक्षिणचे मोतीराम चव्हाण यांनी या मुद्द्याला धरून गटबाजीवर भाष्य केले. नकळत त्यांनी दक्षिणच्या काही नेत्यांना टारगेट करण्याचा प्रयत्न केला. हे भाषण संपताच भीमाशंकर जमादार यांनी मी सर्वांना विनंती करतो, यापुढे गटबाजी वर बोलू नका आपण सर्व एक आहोत. आपल्या पक्षात कोणतीही गटबाजी नाही असे सांगून एक प्रकारे कार्यकर्त्यांना हात जोडण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर लगेच सातलिंग शटगार यांनी आमच्या कुठल्याही पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये गट-तट नाहीत असे सांगत “दिल से दिल जोडो, मन से मन जोडो, हाथ से हाथ जोडो” असा ठराव केला.
जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मागील आठ वर्षापासून देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. निवडणुका आल्या की नवनवीन आश्वासन दिली जातात आणि सत्ता मिळवली जाते. मात्र काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता घरोघरी जाऊन जे काँग्रेसने कमावले आहे तेच भाजप आता विकत आहे हे सांगण्याची गरज आहे. देशात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे मोठे योगदान आहे. हे देश कदापिही विसरू शकणार नाही असे सांगतानाच ग्रामीण भागात ‘हाथचे हात जोडो’अभियान यशस्वी करा असे आवाहन केले.